परिवर्तन न्यूज- Exclusive

महाराष्ट्र आणि युरोपिय देशांमध्ये झालेल्या करारांच्या अंमलबजावणीसाठी विधिमंडळाच्या माध्यमातून पाठपुरावा करणार;- उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे

मुंबई दि. ५ – महाराष्ट्र आणि युरोपिय देशांमध्ये उद्योग, कृषी , शिक्षणांसंदर्भात झालेल्या विविध करारांच्या अंमलबजावणीसंदर्भात विधीमंडळाच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विधिमंडळाच्या सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स आणि लंडन या तीन देशाच्या अभ्यास दौऱ्यावर २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत जाऊन आले. या अभ्यास दौऱ्यासंदर्भात आज उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधला.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की,या देशांची उद्योगवाढीसाठी ध्येयधोरणे, महिलाहक्क आणि महिला संरक्षणासंदर्भातील कायदे, उपाययोजना, शिक्षणव्यवस्था, कृषीप्रक्रिया उद्योग, प्रगत तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षणासंदर्भातील कायदे, ग्रीन एनर्जी, पवनचक्की प्रकल्प, उद्योग, महिला सबलीकरण, महिला अत्याचाराला प्रतिबंध होण्यासाठीचे कायदे यासंदर्भात संबंधित देशांतील उच्चायुक्तांशी चर्चा करण्यात आली. आपल्या राज्यात त्याचा कशा पद्धतीने उपयोग करता येईल याबाबत अहवाल सादर करणार असल्याचे उपसभापती यांनी सांगितले.

राज्याच्या ‍शिष्टमंडळाने लंडन येथे ब्रिटनच्या संसदेचे मुख्यालय राष्ट्रकुल संसदीय मंडळ येथे महासचिव स्टिफन ट्विग यांची अभ्यास भेट घेतली. ॲमस्टरडॅम येथे भारताच्या राजदूत रिनत संधू यांच्यासोबत कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान, आरोग्य, प्रदूषण नियंत्रण, जलव्यवस्थापन, पूरनियंत्रण, नैसर्गिक जलस्त्रोत संवर्धन याविषयांची माहिती जाणून घेतली.

लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात स्मृती संग्रहालय, प्रदर्शने, त्यांची पत्रे उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन सकारात्मक भूमिका निभावणार असल्याचेही डॉ गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

देशातील महाराष्ट्रासह काही राज्यांतील विधिमंडळाच्या महिला सदस्यांच्या गोलमेज परिषदा सी.पी.ए.च्या पुढाकाराने राज्यात घेण्यात याव्यात, आणि त्याद्वारे विकासाच्या संदर्भातील सर्वोत्तम कार्यपद्धती, शाश्वत विकास उद्दिष्टे, संसदीय आयुधे याबाबत अवगत करण्यात यावेत याबाबत महासचिव आणि शिष्टमंडळाने चर्चा केली.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भारत-जर्मनी यांच्यात देवाण-घेवाण सुरू असून, शाश्वत विकास उद्दीष्टाला महत्त्व दिले जावे, इतर देशात मराठी नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. विद्यापीठ , उद्योग यांच्यात झालेल्या संशोधनाचा विद्यार्थ्यांना फायदा मिळावा, यासाठी तेथील शासन समन्वयाची भूमिका बजावत असून, आपल्या देशासोबत झालेल्या कराराच्या माध्यमातून या संशोधनाचा आपल्या विद्यार्थ्यांनाही फायदा व्हावा, याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत. कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पशुसंवर्धन, सहकार चळवळीतील प्रयोग, पाण्याचा वापर, नैसर्गिक आपत्तीवरील उपाययोजना याबाबतीतील संशोधनाचाही आपल्या राज्याला फायदा व्हावा याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली.

या देशातील नागरिकांमध्ये भारत व भारतीयांबद्दल आदर वाढत असून, येथील संस्कृती, खाद्यसंस्कृती, चंद्रयानाचे यशस्वी चंद्रारोहण याबाबत त्यांना कौतुक असल्याचेही उपसभापती यांनी यावेळी सांगितले.

या अभ्यास दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळ सदस्यांनी सामुहिक आणि वैयक्तिकस्तरावर आपल्या मतदारसंघात तसेच राज्यातील नागरिकांना या अभ्यासदौऱ्याचा कसा उपयोग देता येईल यासंदर्भात अहवाल सादर करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button