परिवर्तन न्यूज- Exclusive

एका ठिकाणी आपण चंद्रावर तर दुसरीकडे आपल्याकडे महागाई! शरद पवार

मुंबई,२६ ऑगस्ट:- राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानी सभा कोल्हापूर येथील दसरा मैदानात आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना शरद पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केले. एकीकडे जगात देशाची मान उंचावत असताना दुसरीकडे आपल्या देशातील शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार डुंकून बघायला तयार नाही. यवतमाळ जिल्ह्यातील 18 दिवांसत 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. असे असतानाही त्या प्रश्नाकडे पाहले जात नाही. तर मणिपूर जळत असताना तिथे आया बहिणींची अब्रु लुटली जात असतानाही केंद्र सरकार त्यांच्याकडील ताकदीचा वापर करत नाही. तेव्हा आया बहिणींची अब्रु सांभाळण्याची ज्यांच्याकडे ताकद नाही त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, सध्या देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न ज्वलंत आहेत. कांद्यावर केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात कर लावला. हे अन्यायकारक आहे. असे असतानाच मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही कृषीमंत्री असताना कांद्यासाठी काय केले? तर मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो की मी कृषी मंत्री असताना कांद्यावर कधीही निर्यात कर लावला नाही. जिरायत शेतकरी कांदा पिकवतो. त्या शेतकऱ्याच्या कांद्याला अधिक किंमत कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार मी असे कृषी मंत्री असताना लोकसभा अध्यक्षांना सांगितले होते. आपल्याला आपल्या राज्यातील तरुणांच्या हाताला काम द्यायचे आहे. त्यासाठी कारखाने आले पाहीजे असे असताना महाराष्ट्रात येणारे कारखाने गुजरातला नेले जात आहेत. इथल्या तरुणांना मिळणारी संधी घालवली जात आहे. याकडेही उघड्या डोळ्यांनी बघितले पाहीजे असेही यावेळी शरद पवार यांनी म्हटले.

शरद पवार यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, कांद्यापाठोपाठ आता केंद्र सरकार साखर निर्यात बंद करण्याचे प्रयत्न करणार आहे. तर काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एक वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत कडक उन्हाळ्यात शेतकरी रस्त्यावर बसले होते. मोदी सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांनी त्या शेतकऱ्यांकडे डुंकूनसुद्धा पाहिले नाही. शेतकऱ्यांचा एवढा अपमान इतिहासात कोणत्याच सरकारनी केला नाही. तेव्हा अशा सरकारला सत्तेवर ठेवायचे की नाही याचा निर्धार तुम्हाला करायचा आहे असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार पूढे म्हणाले की, मिळालेली सत्ता सामान्यांसाठी वापरायची असते हे कोल्हापुरनं आपल्याला सांगितलं. शिवाजी महाराजांनी असं राज्य उभं केलं जे भोसल्यांचं राज्य नव्हतं तर ते रयतेचं राज्य होतं. दुसरे एक राजे या देशात होऊन गेले ज्यांनी आपली सत्ता घेऊन समाजाच्या बाजूनं राहिलं. त्यांनी चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला नाही. ढोंगी लोकांना त्यांनी कधी संमती दिली नाही भोंदूहगिरीचा पुरस्कार शांहूंनी कधी केली नाही ते म्हणजे शाहू महाराज, अशा शब्दांत त्यांनी शाहू महाराजांचा दाखला देताना भाजपवर टीका केली.

भारतानं चांद्रयान-3 हे चंदाच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँड केलं आहे. भारतानं हा विश्वविक्रम रचल्यानं अनेक स्तरांतून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एकीकडे आपण चंद्रावर पोहोचलो मात्र दुसरीकडे आपली जनता महागाईने त्रस्त आहे असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. देशाकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या होत्या. आपलं चांद्रयान-3 यशस्वी लँडही झालं आपल्या देशातील तज्ज्ञांनी अशक्य ते शक्य करुन दाखवलं. ही कामगिरी करण्यात महत्त्वाचा वाटा कोणाचा आहे तर इस्रोची स्थापना करणाऱ्या पंडीत नेहरू यांची. तसंच, इंदिरा गांधी, एपीजे अब्दुल कलाम, अटलबिहारी वाजपेयी किंवा नरेंद्र मोदी असोत, या सगळ्यांच्या प्रयत्नाने आज ही इस्रो संघटना जगात महत्त्वाची ठरली आहे. इस्रोने आज हे चांद्रयान तयार केलं परंतु ते तयार करण्यासाठी विक्रम साराभाई, सतीश धवन अशी अनेक नाव सांगता येतील, ज्यांचं यात योगदान आहे आणि त्यामुळे भारतानं आज चंद्राला गवसणी घातली आहे असेही यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले. मणिपूरमध्ये दोन समाजात संघर्ष आहे. तेथे जाळपोळ सुरू आहे. तेथील आया बहिणींची नग्न धिंड काढली जाते. तरीही त्या आया बहिणींसाठी मोदी सरकारकडे वेळ नाही. संसदेत या विषयावर बोलण्यास त्यांच्याकडे वेळ नाही. तेव्हा आपल्याच देशातील आया-बहिणींची अब्रु सांभाळण्याची ज्यांच्याकडे ताकद नाही त्या मोदी सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की केंद्र सरकार सत्तेचा वापर हा विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास कसा देता येईल यासाठी करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सांगण्यात आले आमच्या गटात या, आमच्या पक्षात या नाही तर तुमची जागा तुरुंगात असेल. त्यांनी आपली भूमिका सोडली नाही म्हणून 14 महिने त्यांना तुरुंगात टाकले. सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकले. नवाब मलिक केंद्र सरकारच्या चुकीच्या कारभारावर टीका करत होते. त्यांनाही तुरुंगात टाकले. आता दोन महिन्यांसाठी त्यांना जामीन मिळाला आहे. त्यांना वाटले आम्ही घाबरून जाऊ. मलाही निवडणुकीच्या आधी ईडीची नोटीस आली. ते म्हणाले उद्या या मी म्हणालो आजच येतो. ज्या प्रकरणात मला ईडीची नोटीस आली ती एका बँक व्यवहरातून आली होती. त्या बँकेत माझं खातंही नव्हतं. तेव्हा आपली बाजू सत्याची असेल तर आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. आजचं राजकारण कसं बदलतं आहे ते आपण पाहात आहोत. ईडीचा धाक दाखवला जात आहे. तो धाक दाखवल्यामुळे काहींनी भूमिका बदलली. कोल्हापुरात काही लोकांना ईडीची नोटीस आली. मला वाटलं की कोल्हापुरचे लोक स्वाभीमानी, शूर असतील पण तसं धाडस त्यांनी दाखवलं नाही. भगिनींनी म्हटलं की आम्हाला असा त्रास देण्यापेक्षा गोळ्या घाला. त्या भगिनींनी धाडस दाखवले पण घरातील प्रमुख घाबरले असेही शरद पवार यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button