महाराष्ट्र

“… त्यांचा पक्ष फोडण्याचे पाप मोदीजींनीच केले!”:नाना पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे पंतप्रधानपद मिळाले नाही हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत बालीश व हास्यास्पद आहे. काँग्रेस पक्षात नेहमीच सर्वांना संधी दिली जाते. शरद पवारांनाही काँग्रेसने आमदार, खासदार, मुख्यमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, संरक्षणमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री अशा विविध पदांची जबाबदारी दिली. पण त्याच शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची बदनामी आणि त्यांचा पक्ष फोडण्याचे पाप नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदींच्या भारतीय जनता पक्षाने कायमच शरद पवार यांच्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांची बदनामी करण्याचे काम केले. मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून शरद पवारांचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला आणि तेच नरेंद्र मोदी आज शरद पवारांविषयी फार कळवळा असल्याचे दाखवून मगरीचे अश्रू ढाळत आहेत. नेहरु, गांधी कुटुंबावर घराणेशाहीसह खोटे नाटे आरोप करून बदनामी करणे हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपचे एकमेव काम आहे. पंतप्रधान तेच पुढे घेऊन जात आहेत. काँग्रेस पक्षात विविध जाती धर्मांच्या लोकांना संघटना व सत्तेत महत्वाची पदे दिली जातात. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, तसेच लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षाही काँग्रेस पक्षानेच दिलेल्या आहेत. पंतप्रधानपदाची संधी चालून आलेली असतानाही त्या सर्वोच्च पदाचा त्याग करून काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी डॉ. मनमोहनसिंह यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी दिली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदांसह मुख्यमंत्रीपदावर दलित, वंचित, मुस्लीम समाजातील व्यक्तींना संधी काँग्रेसने दिलेली आहे. याउलट संघ आणि भाजपामध्ये ठराविक वर्गाच्या लोकांना पदे दिली जातात. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी भाजपातील घराणेशाहीचा अभ्यास करावा आणि मग बोलावे.

शरद पवार हे आपले राजकीय गुरु आहेत असे नरेंद्र मोदी म्हणतात यांना दुसरीकडे त्याच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नॅशलिस्ट करप्ट पार्टी म्हणत ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करुन बदनामी करतात. त्याच शरद पवारांचा पक्ष फोडतात आणि वरून त्यांचा फार कळवळा आहे हे दाखवण्यासाठी मगरीचे अश्रू ढाळतात यावरून पंतप्रधानांचे खायचे आणि दाखवायचे दात किती वेगळे आहेत हे दिसून येते असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button